Crime News pudhari photo
यवतमाळ

Umarkhed News | उमरखेड सराफा लाईनमध्ये मध्यरात्री चौघे संशयास्पदरीत्या आढळले; पोलिसांनी घेतले ताब्यात

चोरी, जबरीचोरी किंवा घरफोडीच्या तयारीचा संशय; महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Suspicious Persons Detained

उमरखेड : शहरातील सराफा लाईन परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या चार जणांना उमरखेड पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरी, जबरीचोरी किंवा घरफोडीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे चौघे परिसरात थांबले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.२० वाजण्याच्या सुमारास पोलीस शिपाई हनुमंत मुसळे आणि पोलीस सफाई कर्मचारी मधुकर पवार हे शासकीय वाहनातून शहरात रात्रीची गस्त घालत होते. यावेळी खडकपुरा येथील सराफा लाईन परिसरात रस्त्याच्या कडेला एका भिंतीलगत चार जण संशयास्पदरीत्या बसलेले त्यांना दिसले.

पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन नाव व गाव विचारले. मात्र, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आपली ओळख सांगण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी आपली नावे विशाल सदानंद ऐडके (२६), विजय बाळासाहेब डोईफोडे (२६), भगवान गुंडुदेव टापरे (३५), तिघेही रा. खनीपुरी, ता. जि. जालना, तसेच हरीकांत कैलास रिल (२९), रा. दसनूर, ता. रावेर, जि. जळगाव अशी सांगितली.

पहाटेच्या वेळी सराफा दुकानांच्या परिसरात बसण्याचे नेमके कारण पोलिसांनी विचारले असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे चोरी, जबरीचोरी किंवा घरफोडीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पंचांसमक्ष चौघांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीस शिपाई हनुमंत भगवान मुसळे यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात अप. क्र. १०३९/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ (क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश बोंबले करीत आहेत.

उमरखेड बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स लंपास; ३२ हजारांचा ऐवज चोरीला

उमरखेड : उमरखेड बसस्थानकात बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली. या पर्समध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि आधारकार्ड असा एकूण ३२ हजार ८३० रुपयांचा ऐवज होता. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.

निकिता राजेश काळबांडे (३५, रा. गोरोबा नगर, उमरखेड) या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या पर्समधील २ हजार ७०० रुपये रोख, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले (१० हजार ९३० रुपये) आणि सहा ग्रॅम वजनाची सोन्याची मनीपोत (१९ हजार २०० रुपये), तसेच आधारकार्ड चोरून नेले.

याप्रकरणी काळबांडे यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकूर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT