विदर्भ

यवतमाळ : अपहरण करून बालिकेवर अत्याचार; आरोपीस दहा वर्षाची शिक्षा

backup backup

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : बळजबरीने रिक्षात बसवून १४ वर्षीय बालिकेचे अपहरण केले. त्यानंतर शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. २०१७ मधील या घटनेप्रकरणी एका आरोपीस दहा वर्षाच्या सश्रम कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा येथील विशेष सत्र न्यायालयाने सुनावली. एका १४ वर्षीय बालिकेस तिच्या वडिलांनी यवतमाळ येथील वसतिगृहात सोडले. त्यावेळी आर्णी तालुक्यातील देऊरवाडी (पुनर्वसन) येथील सय्यद इकबाल सय्यद गफूर हा गेटवर येऊन थांबला होता. त्याने बालिकेला बळजबरीने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले. त्यानंतर एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना ३१ मार्च २०१७ रोजी घडली होती.

घटनेनंतर आरोपीने बालिकेला तसेच तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आरोपी सय्यद इकबाल सय्यद गफूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी करून विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.१९) निकाल देत आरोपी सय्यद इकबाल सय्यद गफूर यास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याबरोबरच १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.

निकालानंतर आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिलकुमार एस. शर्मा यांनी बाजू मांडली, पैरवी अधिकारी म्हणून संतोष पटले यांनी सहकार्य केले.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT