Protection of tiger attacks : वनविभागाचा धानपिकाच्या कापणीला खडा पहारा; वाघांच्या हल्ल्याविरोधात उपक्रम | पुढारी

Protection of tiger attacks : वनविभागाचा धानपिकाच्या कापणीला खडा पहारा; वाघांच्या हल्ल्याविरोधात उपक्रम

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वाघांच्या हल्ल्याच्या घटनामुळे शेतातील धानपिकांची कापणी धोक्यात आली आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये महिलांचे धानकापणीला जाण्याचे धाडस होत नाही. या परिस्थितीमुळे धान कापणी कशी करायची? असा प्रश्न उपस्थित झालेला होता. यावर आता वनविभागाने आता जंगलालगत असलेल्या शेतावर खडा पहारा देण्यास सुरूवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वनविभागाने वाघांच्या हल्ल्यावर केलेले हे उपाय पहायला मिळाले. (Protection of tiger attacks)

‘या’ गावांमध्ये वान्यप्राण्यांचा वावर

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका हा भातासाठी प्रसिध्द असून तो वनव्याप्त आहे. बफर, प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल क्षेत्र या तालुक्याला लाभले आहे. तिन्ही जंगल क्षेत्रांमध्ये वाघ, बिबट्यासह विविध वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. मूल, कोसंबी, ताडाळा, चिचाळा, कवडपेठ, कांतापेठ, केळझर, जानाळा, आगडी इत्यादी गावे प्रादेशिक वनक्षेत्रात येतात. करवन, काटवन, मारोडा, डोनी, फुलझरी इत्यादी गावे बफर झोनमध्ये येतात. या दोन्ही वनक्षेत्रात वाघांची प्रचंड संख्या आहे. गावालगत वाघांचा अधिवास वाढला आहे. जंगलात जनावरे चरण्यासाठी गेलेले गुराखी, तसेच शेती परिसरातील शेतकऱ्यांवर वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. मानव व वन्यप्राणी यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष वाढला आहे. (Protection of tiger attacks)

वनविभागामार्फत प्रादेशिक आणि बफर क्षेत्र गावांमध्ये जनजागृती

 वाघांच्या हल्ल्याच्या घटना टाळण्याकरीता आणि धानकापणी वेळेत सुकर व्हावी, याकरीता वनविभागाकडून एक उपक्रम राबविण्यात आलेला आहे. हा उपक्रम म्हणजे वन परिसरातील धान शेतीवर वनरक्षकाच्या माध्यमातून खडा पहारा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या मूल तालुक्यात धान कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. वनविभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे धान कापणी करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांमध्ये येथील नागरिकांचा वन्यजीवांशी संघर्ष वाढला आहे. त्यामुळे वनविभागाच्या माध्यमातून प्रादेशिक आणि बफर क्षेत्रातील गावात जनजागृतीचे देखील काम करण्यात येत आहे. परंतु कायम स्वरूपी मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष् टाळण्याकरीता उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

Back to top button