वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकमेव एकबुर्जी धरणात केवळ 1.33 टक्केच जलसाठा शिल्लक राहिल्याने नागरिकांसमोर गंभीर पाणीटंचाईचं संकट उभं राहिलं आहे. जून महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे धरण परिसरात अजूनही समाधानकारक पाऊस झालेलं नाही यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्याऐवजी तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
परिणामी, शहरासाठी नियमित पाणीपुरवठा करणं आता मोठं आव्हान बनलं आहे. एकबुर्जी धरणातूनच संपूर्ण वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जातो, पण आता केवळ काही दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे नगर परिषदेसमोर शहराला पाणी देण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं असून, गैरवापर टाळावा असंही सांगितलं आहे. अत्यंत मर्यादित साठा असतानाही सध्या काटकसरीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, परंतु लवकरात लवकर पावसाने हजेरी लावली नाही तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनीही पाणी साठवताना, वापरताना आणि वितरण व्यवस्थेच्या अडचणी समजून घेत शिस्त पाळणं गरजेचं आहे. वाशिम शहरावर आलेलं हे पाणी संकट फक्त प्रशासनासाठी नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी जबाबदारीचं आहे.