
Disha Girls Home Security
वाशिम: वाशिममधून एक चिंताजनक बातमी आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या दिशा मुलींच्या निरीक्षण गृहातून सहा दिवसांपूर्वी १६ वर्षीय अल्वयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. या मुलीने निरीक्षण गृहाच्या १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून पळ काढला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, यात त्या अल्पवयीन मुलीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे केवळ प्रशासनावरच नव्हे तर बाल संरक्षण यंत्रणेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाशिमच्या दिशा मुलींच्या निरीक्षण गृहात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक फरार झाली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी तिने निरीक्षण गृहाच्या वरच्या मजल्यावरून कपडे वाळू घालण्याच्या बहाण्याने ती गॅलरीत आली आणि काही कळायच्या आत तिने १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून पळून बाहेर पडली. तेव्हापासून तिचा कोणताच पत्ता लागलेला नाही.
पोलिस आणि बाल संरक्षण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कोणतेही ठोस यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत, हा प्रश्न स्पष्ट आहे की जर संरक्षित संस्थांमध्येही मुली सुरक्षित नसतील तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.