वाशीम - काटा येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते ४ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनेक चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप समोर आल्याने काटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षक दिलीप बोरकर (वय ५६ वर्षे) यांच्याविरुद्ध जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ३५४ तसेच POCSO कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्थानकातून प्राप्त झाली आहे.
शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण असावे, अशी अपेक्षा असताना शिक्षकावरच अनेक अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्याने पालकवर्गात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली आहे. प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटीक यांनी सदर प्रकारणाची गंम्भीर दखल घेत संबंधित शिक्षकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली असून, घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
शाळांमधील बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि पालकांच्या विश्वासाचे केंद्र मानले जातात. त्यामुळे शिक्षकावर अशा प्रकारचा गंभीर आरोप झाल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये कोणताही दबाव न आणता निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी होत आहे.