वाशीम : लग्नाच्या मंडपातील लोखंडी खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा तीव्र धक्का बसून युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. कारंजा तालुक्यातील कोळी गावातील संदीप अशोक इंगळे (वय २८ वर्षे, रा. कोळी) या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला.
या घटनेमुळे कोळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अवघ्या २८व्या वर्षी संदीप यांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निष्काळजीपणा की विद्युत सुरक्षेचा अभाव? या घटनेच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभातील मंडप उभारणी आणि विद्युत जोडणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.