Washim Traffic Police Campaign
वाशिम : शहरातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वाशिम शहर वाहतूक शाखेने मंगळवारी (दि.२६) विशेष धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत एका दिवसात तब्बल २ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील विविध भागांमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्यातील कलम ६६/१९२ अंतर्गत २९ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की, अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातील ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
तसेच, सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरणारी अवैध वाहतूक अथवा इतर बेकायदेशीर प्रकार आढळल्यास नागरिकांनी शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी बाळासाहेब किसनराव नाईक यांनी केले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब किसनराव नाईक यांच्यासह सपोउपनि रविंद्र लोखंडे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल संगीता शिंदे, पोलीस कर्मचारी सुनील वाणी, दीपक मुळे, विष्णू साबळे तसेच चालक पोहेकॉ रामेश्वर दोनतकर यांनी सहभाग घेतला.