Vijay Tapadia Gutkha Mafia Arrested Washim
वाशीम: जिल्ह्यातील अवैध गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजयकुमार धोंडूराम तापडिया (वय ५१, रा. रामनगर, लोणी फाटा, रिसोड, जि. वाशीम) याला वाशीम ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रिसोड येथील त्याच्या राहत्या घरासमोरून पोलिसांनी ही कारवाई केली असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
१ ऑगस्ट २०२६ रोजी जांभरून नावजी उड्डाणपुलाजवळ वाशीम ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई करून ९ लाख ७४ हजार ९३० रुपये किमतीचा अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात विजय तापडिया याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले होते. हा प्रतिबंधित साठा वाशीम शहरातील 'पवन' नामक व्यापाऱ्याकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती तपासात पुढे आली होती.
या गुन्ह्याप्रकरणी वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्न सुरक्षा अधिकारी विश्वास जाणूसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून नोंद झालेल्या या गुन्ह्यात विजय तापडिया तेव्हापासून फरार होता.
विजय तापडिया याच्या ताब्यामुळे या अवैध तस्करी साखळीतील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रतिबंधित माल त्याने कोठून मिळवला आणि या रॅकेटमध्ये राज्यातील व जिल्ह्यातील आणखी कोणकोणते व्यापारी व तस्कर सामील आहेत, याचा तपास आता अधिक वेगाने होणार आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे आणि ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले यांच्यासह पोलीस अंमलदार विनोद अवगळे, दिलीप देवकते, भूषण ठाकरे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे आणि सुनील तायडे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. ताब्यात घेतलेल्या विजयकुमार तापडिया याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेते आणि तस्करांचे धाबे दणाणले असून, पुढील तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.