Fraud News  Pudhari
वाशिम

Property Fraud Washim | मालमत्ता व्यवहारातील ५९.५१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

निवृत्त शिक्षक लक्ष्मण वानखेडे यांच्या तक्रारीच्या चौकशीनंतर पोलिसांची कारवाई; BNS अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

Washim Police Fraud Case Registered

वाशीम : मालमत्ता व्यवहारात संगनमत करून ५९ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीप्रकरणी वाशीम पोलिसांनी अखेर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बुधवारी (दि. १६) रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जुनी IUDP कॉलनी, वाशीम येथील निवृत्त शिक्षक लक्ष्मण प्रल्हाद वानखेडे यांनी मालमत्ता व्यवहारात आपली कथित फसवणूक झाल्याची तक्रार वाशीमच्या पोलिस अधीक्षकांकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कागदपत्रे आणि प्राथमिक स्वरूपातील माहितीची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.

या प्रकरणातील कथित आर्थिक व्यवहार, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत वानखेडे यांनी पाठपुरावा केला. तसेच या प्रकरणाची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक (IG) यांच्यासमोरही मांडल्याचे त्यांनी सांगितले.

तपासातून सत्य समोर येण्याची अपेक्षा

गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, मालमत्तेच्या कागदपत्रांची सत्यता, ओळख पटविण्याची प्रक्रिया, नोंदणी कार्यालयातील कागदपत्रे, संबंधित साक्षीदार तसेच व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.

निवृत्त शिक्षकाच्या तक्रारीनंतर मोठ्या रकमेच्या कथित फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाल्याने या तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून व्यवहारातील नेमकी वस्तुस्थिती आणि जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण प्रकरणाची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांना दिली आहे. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- लक्ष्मण वानखेडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT