Washim Traffic Rules Violation
वाशिम : वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई मोहीम राबवली आहे. १ ते १९ ऑक्टोबर २०२६ या अवघ्या १९ दिवसांच्या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तब्बल १ हजार ७१९ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. अपघातांना आळा घालणे, वाहतुकीला शिस्त लावणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शहर वाहतूक शाखेने विविध प्रकारच्या नियमभंगांविरुद्ध कारवाई केली. यामध्ये नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करण्याची सर्वाधिक ४३१ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्याखालोखाल HSRP नंबर प्लेट नसल्याची ३३८, तर ट्रिपल सीट वाहन चालविण्याची ३१८ प्रकरणे आढळली. फॅन्सी, तुटलेल्या किंवा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर प्रत्येकी १६७ प्रकरणांत कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमभंगाच्या कारवाईमध्ये रिफ्लेक्टर नसणे (९६), वैध वाहन परवाना सादर न करणे (७९), विरुद्ध दिशेने वाहन चालविणे (३४) आणि अवैध प्रवासी वाहतूक (१९) या प्रकरणांचा समावेश आहे. नंबर प्लेटवर दादा, मामा, काका, बाबा असे शब्द लिहिणाऱ्या ११ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.
याशिवाय, १८ वर्षांखालील व्यक्तींकडून वाहन चालविण्याची आठ प्रकरणे, मालवाहू वाहनातून व्यक्तींची वाहतूक करण्याची तीन प्रकरणे, बहुरंगी दिव्यांचा अनधिकृत वापर आणि वाहनाच्या बॉडीबाहेर असुरक्षित पद्धतीने माल वाहून नेण्याची प्रत्येकी दोन प्रकरणे नोंदवण्यात आली. तसेच १६ वर्षांखालील व्यक्तीकडून वैध परवान्याशिवाय वाहन चालविण्याचे एक प्रकरण आढळले.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांच्या कारवाईसोबत नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे, वाहनांना नियमानुसार नंबर प्लेट लावणे, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी न करणे आणि अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन न देणे आवश्यक आहे.
शहर वाहतूक शाखेच्या या मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना आळा बसण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध होऊ शकते.