Criminal Crackdown Washim
वाशिम : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींवर वाशिम पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या निर्देशानुसार ३ ते ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री जिल्ह्यात विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या मोहिमेत चार पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या १६ पथकांनी एकाचवेळी ३२ ठिकाणी छापे टाकले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत शिरपूर पोलिसांनी पाहिजे असलेला आरोपी लक्ष्मण मधुकर चव्हाण याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. घरझडतीत एक गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे, दोन तलवारी, सहा कुऱ्हाडी, दहा लोखंडी सुरी-कोयते, ५०० फूट केबल, केबल कटर आणि एक गावठी शस्त्र असा सुमारे ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याच कारवाईत जुगनू मुसींग पवार याच्या घरातून तलवार व देशी दारूचे २४ क्वार्टर जप्त करण्यात आले. शंकू गोविंदा पवार या पाहिजे आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले. चंद्रकांत गोविंदा पवार याच्याकडून ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
वसारीजवळ संशयास्पद तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच बोरगाव येथील एका संशयिताकडून तलवार व चोरीचा किराणा माल जप्त करून त्याला अटक करण्यात आली. चांडस येथून कागदपत्रे नसलेली बजाज पल्सर दुचाकीही ताब्यात घेण्यात आली.
या मोहिमेत तीन आर्म्स अॅक्ट, दोन दारूबंदी प्रकरणे आणि पाहिजे/फरार आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. मोहिमेत १२ पोलीस अधिकारी आणि ८८ अंमलदार सहभागी झाले होते.