२२ वर्षांपासून फरार असलेल्या खुनी महिला आरोपीला अटक करण्यात वाशीम पोलिसांना अखेर यश आले  Pudhari
वाशिम

Washim Crime | प्रियकराचा खून करून गुजरातमध्ये फरार; एका फोटोवरून २२ वर्षांनी महिलेला पकडण्यात वाशिम पोलिसांना यश

सोशल मीडियावरील एका फोटोच्या सुगाव्यावरून पोलिसांनी क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावला

पुढारी वृत्तसेवा

Washim Police Absconding Woman Arrested

अजय ढवळे

वाशीम : लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वाद आणि फसवणुकीच्या रागातून २५ जून २००४ रोजी झालेल्या एका खळबळजनक खून प्रकरणातील गेल्या २२ वर्षांपासून फरार असलेल्या खुनी महिला आरोपीला अटक करण्यात वाशीम पोलिसांना अखेर यश आले आहे. पंचशीला उत्तम थोरात (वय ४२, रा. वाशीम, सध्या रा. खंबालिया, गुजरात) असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावरील एका फोटोच्या सुगाव्यावरून पोलिसांनी क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावला.

प्रेम, फसवणूक आणि सूडाचा थरार

या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत नाट्यमय आहे. २००२ च्या सुमारास पंचशीला थोरात आणि तोंडगाव येथील रहिवासी तथा मृतक माधव सदाशिव गोटे (वय २० वर्ष) यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघेही घरून पळून गेले होते आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, माधव गोटे याने लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले आणि नंतर पंचशीलाला सोडून दिले.

या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या पंचशीलाने माधवविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, जी केस वाशीम न्यायालयात सुरू होती. गुन्हा दाखल होऊनही माधवचा त्रास कमी झाला नव्हता. तो वारंवार पंचशीलाच्या घरी जाऊन जबरीने शरीरसंबंध ठेवत, बलात्काराची केस मागे घेण्यासाठी धमकावत आणि छळ करत होता. या रोजच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पंचशीलाने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. २५ जून २००४ रोजी माधव झोपेत असताना, पंचशीलाने त्याच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केले आणि डोक्यावर दगड मारून निर्घृणपणे त्याचा खून केला.

या खळबळजनक हत्याकांडानंतर वाशीम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर पंचशीला हिला अटक झाली आणि ती सुमारे ६ महिने वाशीम जिल्हा कारागृहात होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली.

वाशिम सत्र न्यायालयाने तिला दोषी ठरवल्यानंतर तिने हायकोर्टात अपील केले, जिथे तिची जन्मठेपेची शिक्षा कमी करून १० वर्षे करण्यात आली. या निर्णयाविरोधात तिने सुप्रीम कोर्टात धाव घेतली, परंतु सुप्रीम कोर्टानेही १० वर्षांची शिक्षा कायम ठेवली. हा अंतिम निकाल लागल्याचे समजताच ती पोलिसांना चकमा देऊन फरार झाली होती.

'मोबाईल' टाळला, पण नवऱ्याच्या एका 'पोस्ट'ने घात केला

फरार झाल्यानंतर पंचशीला थेट गुजरातमध्ये पोहोचली. तिथे तिने ओळख लपवून एका गुजराती तरुणाशी लग्न केले आणि संसार थाटला. ती कमालीची चतुर होती. मोबाईल वापरल्यास पोलीस आपले लोकेशन ट्रॅक करून आपल्याला पकडतील, याची तिला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे पोलीस जाळ्यात अडकू नये म्हणून तिने स्वतः कधीच मोबाईल वापरला नाही.

परंतु, तिचा पती मोबाईल आणि सोशल मीडियाचा नियमित वापर करायचा. पतीने सोशल मीडियावर पंचशीलासोबतचे काही फोटो अपलोड केले होते. वाशीम सायबर पोलीस आणि तपास पथकाने याच फोटोंचा अचूक माग काढला आणि २२ वर्षांनंतर तिच्यापर्यंत पोहोचण्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.

गुन्हा घडला आणि तिने लग्न केले, तेव्हा तिचे वय केवळ १९ वर्षे होते. आज तब्बल २२ वर्षांनंतर तिचे वय ४१ वर्षे झाले आहे. दोन दोन दशकांहून अधिक काळ लोटल्याने आणि वयानुसार तिच्या चेहऱ्यात प्रचंड बदल झाला होता. त्यामुळे समोर दिसणारी महिला हीच ती फरार पंचशीला थोरात आहे का, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला होता.

यावर मात करण्यासाठी पोलिसांनी पंचशीलाच्या जुन्या ओळखीतील आणि नातेवाईक असलेल्या काही लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांची ओळख परेड घेऊन खात्री पटवण्यात आली आणि अखेर तीच खरी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

वाशीम पोलिसांनी स्थानिक सायबर शाखा आणि गुजरात येथील खंबालिया पोलीस ठाण्याच्या मदतीने सापळा रचला. वाशीम शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय रवी सैबेवार, एएसआय कैलास कोकाटे, एलएचसी कविता, शैलेश ठाकूर, महादेव भिमटे, नितीन काळे, हरीश गावंडे, उमेश देशमुख आणि पथकाने अत्यंत गुप्ततेने ही कारवाई केली. सत्र न्यायालय, वाशीम यांच्याकडील वॉरंटनुसार तिला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. वाशीम पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात सर्वत्र पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT