

Washim Asha Workers Protest
वाशिम: आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा वाशिम जिल्ह्यातील सर्व आशा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिव पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य आयुक्त तसेच संबंधित प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आशा कर्मचाऱ्यांवर त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील अनेक कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असून, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व माहितीही उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे अशा अतिरिक्त कामांची सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या गटप्रवर्तकांना कायम सेवेत सामावून घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
किमान वेतन कायद्यानुसार आशा सेविकांना दरमहा २६ हजार, तर गटप्रवर्तकांना ३४ हजार मानधन शासनाने मंजूर करावे, अशीही प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्ह्यातील सर्व आशा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिव पदाचा सामूहिक राजीनामा देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाजी बुचड, जिल्हाध्यक्ष हर्ष खडसे, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना हिवराळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलिस अधीक्षक व संबंधित प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत.