

Ayodhya Ram Temple Donation Irregularities
वाशीम : अयोध्या येथील राम मंदिरातील कथित आर्थिक अपहाराच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि.१४) ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आयोजित करण्यात आला. भजन, पूजन, आरती, दिंडी आणि प्रार्थनेच्या माध्यमातून हा आंदोलनात्मक कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात वाशिम येथील श्रीराम मंदिर, शनी मंदिर आणि बालाजी मंदिर येथे टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या दिंडीने झाली. बालाजी मंदिरात दर्शन, भजन, आरती व प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर शनी मंदिरातही दर्शन व भजनाचा कार्यक्रम झाला.
मुख्य कार्यक्रम श्रीराम मंदिरात पार पडला. यावेळी भजन, पूजन, आरती, पसायदान आणि प्रसाद वितरण करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करत अयोध्या येथील राम मंदिरातील कथित देणगी अपहार, दानपेटीतील रक्कम व मौल्यवान दागिन्यांच्या चोरीप्रकरणी दोषींना सद्बुद्धी मिळावी आणि त्यांच्या कृत्याची योग्य शिक्षा व्हावी, अशी प्रार्थना केली.
यावेळी कीर्तनकार पंढरीनाथ इंगोले महाराज यांनी प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर विवेचन केले. तसेच उपस्थित वारकरी आणि रामभक्तांनी अयोध्या राम मंदिरातील कथित अपहाराबाबत नाराजी व्यक्त केली.
सत्याग्रहानंतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी व भजनी मंडळी यांनी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सत्याग्रहाचा समारोप करण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. दिलीपराव सरनाईक, माजी सभापती किसनराव मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव देशमुख, तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेवराव सोळंके, कारंजा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयराव देशमुख, परसराम भोयर, गजानन गोटे, नगरपरिषद सदस्य राजू वानखेडे, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.