Washim Blackmailing Minor Girl
वाशिम : शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावत व ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न करण्याचा तगादा लावणाऱ्या आरोपीला वाशिम शहर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शे. शाहरुख शे. गफुर (वय ३५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजता आरोपी फिर्यादीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने मुलीशी लग्न न केल्यास घराच्या गेटवर आत्महत्या करण्याची धमकी दिली, तसेच संपूर्ण कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी दहशत निर्माण करून तो तेथून पळून गेला.
तक्रारीनुसार, आरोपी गेल्या अकरा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. ती किराणा दुकानात एकटी असताना तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करणे, लग्नासाठी दबाव टाकणे, तसेच एमएस-सीआयटीच्या वर्गाला जाताना तिचा पाठलाग करून धमक्या देणे, असे प्रकार तो सातत्याने करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीला बोलण्यासाठी स्वतःचा मोबाईल दिला होता. त्या मोबाईलवरून तो वारंवार फोन व संदेश पाठवून लग्नासाठी जबरदस्ती करत असे.
आई-वडिलांच्या जीवाला धोका होऊ नये, या भीतीपोटी मुलगी आरोपीशी संवाद साधत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. लग्नाचे आमिष दाखवून, जीवे मारण्याच्या धमक्या देत, भेटवस्तू देऊन व फोनवर बोलण्यास भाग पाडून आरोपीने मुलीला मानसिक त्रास दिला. तसेच २४ जानेवारी रोजी रात्री आरोपीने घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीसह संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेला आरोपीकडून धोका असल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीच्या आधारे वाशिम शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
आरोपी शे. शाहरुख हा विवाहित असून त्याला दोन अपत्ये असल्याची माहिती समोर आली आहे. विवाहित असतानाही अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू असून, निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.