

Risod Taluka Child Marriage Prevented
वाशिम: जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम हराळ येथे होऊ घातलेला सोळा वर्षीय बालिकेचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. बालविवाहाबाबत चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित बालिकेच्या वयाची तात्काळ खातरजमा करण्यात आली. यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांच्या आदेशानुसार संयुक्त पथक गठीत करण्यात आले.
चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक अविनाश सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल देशपांडे, प्रतिभा घनसावत, राम वाळले व निलिमा भोंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बालिका व तिच्या पालकांचे समुपदेशन केले. बालविवाहाचे कायदेशीर परिणाम, आरोग्यविषयक धोके व मुलीच्या भवितव्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
समुपदेशनानंतर मुलीचे वय पूर्ण १८ वर्षे होईपर्यंत विवाह करणार नाही, असे पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. त्यामुळे होऊ घातलेला बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात आला.
या कारवाईसाठी तालुका संरक्षण अधिकारी बंडू धनगर, संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे एका बालिकेचे बालपण आणि भविष्य सुरक्षित झाले आहे.