वाशिम शहर परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्याच सावत्र बापाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वाशीम शहर पोलीस ठाण्यात संबंधित संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी संशयित व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, घरात अभ्यास करत असलेल्या १६ वर्षीय सावत्र मुलीचा अयोग्य स्पर्श करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिची आई धावून आली.
आईने या कृत्याचा विरोध केला असता, आरोपीने तिला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले तसेच अश्लील शिवीगाळ करून आई व दोन्ही मुलींना जीवाने मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेनंतर पीडितेच्या आईने वाशीम शहर पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती कथन करत तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. वाशिम शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.