

नगर: अहिल्यानगर शहराजवळील देवगाव (ता. जि. नगर) शिवारातील पवन चक्की पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीला दुचाकीवर आलेल्या दोघा नराधमांनी निर्जनस्थळी नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.
याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
संदेश गोरक्षनाथ शिंदे, मोहित अशोक खळे (दोघे रा. देवगाव) असे संशयित आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणी अहिल्यानगर शहरात एका कंपनीत खासगी नोकरी करीत असून सध्या सावेडी परिसरात राहते. तिच्यासोबत काम करणारा २० वर्षीय तरुण तिचा मानलेला भाऊ आहे. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी दोघे दुचाकीवरून देवगाव परिसरातील पवनचक्की पाहण्यासाठी गेले होते.
साडेसहाच्या सुमारास ते एका पवनचक्कीजवळ थांबले असताना, तिथे दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली. सोबतच्या तरुणाला त्या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने तरुणीला एका दुचाकीवर आणि सोबतच्या तरुणाला दुसऱ्या दुचाकीवर बसवून घाटाच्या दिशेने निर्जन भागात नेले.
तिथे दोघांचे मोबाईल हिसकावून घेत आरोपींनी तरुणीवर अत्याचार केला. तिच्या मानलेल्या भावाला बेदम मारहाण केली. तिथे दोघांच्या ओळखीचा एक तरुण आला. त्यालाही त्यांनी हाकलून दिले. दरम्यान, तो आणखी एकाला घेऊन आला. त्या दोन तरुणांनी धाडस दाखवत पीडित तरुणीची आणि तिच्या मानलेल्या भावाची सुटका केली. त्यानंतर आरोपी पसार झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवून दोन्ही संशयितांना ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारूळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.