वाशिम : गोरबंजारा समाज हा आदिम सभ्यता असलेला लोकसमूह आहे. स्वतंत्र रुढी प्रथा परंपरा जोपासणारा निसर्गाशी एकरुप असलेला समाज आहे. अनुसुचित जमातीचे निकष पूर्ण करणाऱ्या या समुहाने गेली अनेक वर्षांपासून एसटी आरक्षणासाठी लढा उभारला आहे. मात्र विधीमंडळात पाहिजे तेवढ्या प्रमाणात कुणी आवाज न उठवल्याने हा प्रश्न तसाच आहे. मी मात्र येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरुन चर्चेला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. किरणराव सरनाईक यांनी केले.
वाशीम येथे गोरसेनेच्या शिष्टमंडळाने आ. सरनाईक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याप्रसंगी आ. किरणराव सरनाईक बोलत होते. अमरावती शिक्षक मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल आ. सरनाईक यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य अरुणराव सरनाईक, डॉ. अनिल राठोड, प्रा. रतन राठोड, प्राचार्य विष्णू राठोड, प्रा. कैलास राठोड, जयसिंग धेगावत, पंकज पवार, बाबुसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षकांची जुन्या पेन्शन योजना सह शिक्षकज्ञव शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्येबाबत आमदार महोदयाशी सविस्तर चर्चा करण्यात आली.