Washim Education Officer Bribe Allegation Pudhari
वाशिम

Washim Bribe | शिफारस पत्रासाठी शिक्षणाधिकाऱ्याने ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; शिक्षण विभागात खळबळ

वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला

पुढारी वृत्तसेवा

Washim Education Officer Bribe Allegation

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांनी एका शिक्षकाला शिफारस पत्र देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समोर आला. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील एका शिक्षकाला शिफारस पत्राची आवश्यकता असल्याने त्यांनी सुमारे चार ते साडेचार महिन्यांपूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात संबंधित फाईल दाखल केली होती. मात्र, शिफारस पत्र देण्याबाबत सतत टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव त्या शिक्षकाला आला. दरम्यान, शिफारस पत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप समोर आला असून, याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या प्रकाराची दखल अमरावती विभागातील शिक्षक नेत्या डॉ. संगीता शिंदे (बोंडे) यांनी घेतल्याची माहिती आहे. संबंधित शिक्षकाने आपली तक्रार त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना जाब विचारल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.

यासोबतच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्याबाबत तसेच शिक्षणमंत्र्यांकडेही हा विषय मांडण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, वाशीम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून विविध वादांमुळे चर्चेत राहिला आहे. या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT