

Talathi Arrested Washim
वाशिम : आई-वडिलांनी आयुष्यभर कष्टाने कमावलेली शेतजमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठीही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दारात चकरा माराव्या लागतात, हे लोकशाहीतील विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. आईच्या नावावर असलेली जमीन मुलाच्या नावे करून देण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
रवींद्र रंगनाथ खुळे (वय ४९, सध्या रा. मंगरूळपीर) येथे तलाठी म्हणून कार्यरत, याने तक्रारदाराच्या आईच्या नावावरील शेतजमिनीचा फेरफार व वारस नोंद करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत आरोपीने १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुरूवारी (दि. १५) दुपारी पहिल्या टप्प्यातील १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याच्यावर कारवाई करत रंगेहाथ पकडले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून लाचेचे १० हजार रुपये, अतिरिक्त २ हजार ७६० रुपये रोख रक्कम आणि एक महागडा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या संभाव्य मालमत्तेचा तपास केला जात आहे.
ही कारवाई वाशिम एसीबीच्या पोलीस निरीक्षक अलका गायकवाड आणि पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस हवालदार नितीन टवलारकर, विनोद अवगळे, योगेश खोटे, महेश परमेश्वरे, नाविद शेख आणि मंगेश देवकते यांचा समावेश होता.
आजही ग्रामीण भागात सातबारा उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी किंवा जमिनीचे फेरफार करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या दारात हात जोडून उभे राहावे लागते. मजुरी करून किंवा पीक विकून मिळालेल्या पैशांवर डोळा ठेवणारी ही भ्रष्ट यंत्रणा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. आईच्या नावावरील जमिनीसाठीही मुलाला लाच द्यावी लागत असेल, तर या व्यवस्थेत माणुसकी उरली आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.