Student Issues Congress Protest Warning
वाशीम : देशातील वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राजस्थानातील कोटा येथे आयोजित ‘छात्रों की गुंज’ (विद्यार्थ्यांचा आवाज) रॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना अन्यायकारक परीक्षा व्यवस्थेतून मुक्त करण्याची गरज व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ९) वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या वतीने जनसंपर्क अभियान व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेषतः ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही रोजगाराच्या संधी आणि परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत मोठी असुरक्षितता असल्याचे त्यांनी सांगितले.
परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून, अशा घटनांमुळे आत्महत्येसारख्या टोकाच्या घटना घडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर आणि पारदर्शक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला शासनाने तातडीने आळा घालावा. अन्यथा काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या वतीने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शासन आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. दिलीपराव सरनाईक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव सरनाईक, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शिवम वाघ यांच्यासह उज्ज्वल देशमुख, नयन कन्हे, सागर मैसने, समाधान माने, राजूभाऊ वानखेडे, सागर भिसडे, महादेवराव सोळंके, परसराम भोयर, सागर गोरे, राजू घोडीवाले आदी उपस्थित होते.