Traffic Issues Washim
वाशिम : शहरातील पाटणी चौक ते शिवाजी चौक व बालाजी मार्केट परिसरात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झालेली होती. फळ, भाजी विक्रेते हे मुख्य रस्त्यावर त्यांच्या फळभाजीच्या गाड्या उभ्या करीत असल्याने तसेच व्यापाऱ्यांनी त्यांचे दुकानांसमोर शेड उभारून अतिक्रमण केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना खुप मोठा अडथळा निर्माण होत होता. व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानातील माल रोडवर ठेवलेला असल्याने वाहतुकीस अडचणी निर्माण होत होती. यामुळे शहरातील अनेक नागरीक त्रस्त होते. दिवसेंदिवस वाहतुक समस्या गंभीर होत असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी याची दखल घेत कार्यवाही करण्याचे आदेशित केले.
त्यानुसार अनुज तारे, पोलीस अधिक्षक वाशिम, लता फड, अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात नवदिप अग्रवाल, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग वाशिम, रामकृष्ण महल्ले, देवेंद्रसिंह ठाकुर, संतोष शेळके व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नगरपरिषद वाशिम मुख्याधिकारी निलेश गायकवाड व त्यांचे पथक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाशिम संग्राम जगताप व त्यांचे पथक अशा तीन विभागांच्या पथकांनी संयुक्त कार्यवाही करून वाशिम शहरातील पाटणी चौक ते शिवाजी चौक व बालाजी मार्केट परिसरातील फळभाजीच्या गाड्या, व्यापाऱ्यांनी रोडवर उभारलेली शेड इत्यादी अतिक्रमण काढून कार्यवाही केली आहे. व्यापाऱ्यांना त्यांचे दुकानातील माल रोडवर न ठेवणे बाबत सुचना दिल्या आहेत.
भाजीपाला व फळविक्रेते यांना आवाहन करण्यात येते की आपल्याला नगरपरिषद वाशिम यांनी निर्देशित केलेल्या जागेतच आपण आपली दुकाने लावावीत तसेच नागरीकांनी आपली वाहने पार्कीग करीता राखीव असलेल्या जागेतच उभी करावीत जेणे करून वाहतुक समस्या उद्भवणार नाही. कोणीही वाशिम शहरातील पाटणी चौक ते शिवाजी चौक व बालाजी मार्केट परिसरात रोडवर भाजीपाला व फळ गाडी उभी करणार नाही, तसेच दुकानासमोर शेड उभारून रोडवर दुकानातील माल ठेवणार नाही किंवा रोडवर आपले वाहन उभे करणार नाही, अन्यथा प्रशासनातर्फे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.असा संयुक्तरित्या इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिला आहे.