State Bank of India Nationwide Employees Strike
वाशिम: विविध १६ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन (AISBISF) यांनी २५ व २६ मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील स्टेट बँकेच्या २२० हून अधिक शाखांतील सुमारे 850 कर्मचारी व उपकर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
२ मे रोजी एसबीआय अध्यक्षांना पाठविलेल्या नोटीसमध्ये फेडरेशनने औद्योगिक वाद कायदा १९४७ अंतर्गत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सार्वजनिक सुट्ट्या आल्यास संप २७ मेपर्यंत वाढविण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
२५ व २६ मे रोजी होणाऱ्या या संपामुळे २३ व २४ मेच्या सुट्ट्यांसह सलग चार दिवस बँक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, इतर सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी बँका नियमितपणे सुरू राहतील.
फेडरेशनने १६ मागण्या सादर केल्या असून, “कामगारांचे हक्क पद्धतशीरपणे हिरावले जात आहेत. अनेक दशकांच्या संघर्षातून मिळालेले संरक्षण कमी केले जात आहे, करार केवळ औपचारिकता बनले आहेत आणि विरोधी मतांना दुय्यम स्थान दिले जात आहे,” असे AISBISF ने म्हटले आहे.
वारंवार चर्चा, निवेदने आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही व्यवस्थापनाने उदासीनतेची भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे संपाचे आवाहन करावे लागत आहे असे प्रतिपादन संघटनेचे विभागीय सचिव अविनाश बोचरे यांनी केले.
कर्मचारी संघटनेने सेवा अटी सुधारण्यासाठी आणि कामकाजातील संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी १६ मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये शाखांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी मेसेंजर आणि सशस्त्र सुरक्षा रक्षकांची भरती करण्याची मागणीही समाविष्ट आहे.
अमरावती विभागातील SBISU संघटनेचे प्रतिनिधित्व मंगेश दुबळे, अभिजीत टाले, अविनाश बोचरे, मोहनीश ठाकरे, नितीन दांदळे, योगेश कातखेडे, सागर अनासाने, अजय येवतकर आणि इतर पदाधिकाऱ्यांचा यांच्याकडे आहे.