Samruddhi highway vaccine robbery case
वाशिम : समृद्धी महामार्गावर तब्बल २ कोटी ४३ लाखांच्या लसींची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही टोळी दुसऱ्या चोरीच्या तयारीत असताना पोलिसांनी धाडसी सापळा रचून त्यांना पकडले , अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी आज (दि.८) पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी येथून नागपूरमार्गे कोलकात्याकडे निघालेल्या कंटेनर (MH04JK7054) मधून २३ जुलै रोजी ४६ बॉक्समधील लस अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. कंपनीच्या तक्रारीवरून कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तब्बल ८५ हजार वाहनांची तपासणी करून संशयित ट्रक शोधण्यात आला. आरोपी पुढील चोरीसाठी गोव्याला जात असताना वाशिमजवळ कारंजा परिसरात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील देवास येथे टोळीचा मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान व त्याचा साथीदार भारत घुडावद यांनाही अटक करण्यात आली. सर्व आरोपी हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.
कारवाईदरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर, ट्रक, स्कॉर्पिओसह ३८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर यापूर्वी ११ गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनीही मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. सध्या सर्व आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.
या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक लता फड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी उपस्थित होते. या कामगिरीबद्दल वाशिम जिल्हा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.