

वाशीम : वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी- नाले तुंडूंब भरून वाहत आहेत. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घरांच्या भिंती कोसळणे, गुरे-जनावरे पाण्याबरोबर वाहून गेल्याचीही घटना घडल्या असून जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाच्या दुर्घटनेत आजवर चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने गुरूवारी (दि.२१) दिली.
घरांच्या पडझडीत वाशिम तालुक्यात ९७, रिसोड तालुक्यात १८४, मालेगाव तालुक्यात ७२ आणि मंगरूळपिर तालुक्यात ५१ अशा एकूण ४०४ घरांची अंशतः पडझड झाली आहे. शेत जमिनीच्या नुकसानीत वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये १६१ हेक्टर तर मालेगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ६७ हेक्टर शेतीचे नुकसान होऊन एकूण २२८ हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.