Raju Bhandurge Shiv Sena  Pudhari
वाशिम

Washim Municipal Council | वाशिम नगर परिषदेत राजकीय अ‍ॅडजस्टमेंट'चा नवा पॅटर्न : सत्तेचे साटेलोटे

Washim Politics | शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे राजू भाऊ भांदुर्गे यांची बिनविरोध निवड

पुढारी वृत्तसेवा

Raju Bhandurge Shiv Sena

अजय ढवळे

वाशिम : वाशिम नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे लोकशाहीचा रणसंग्राम होण्याऐवजी, 'पडद्यामागच्या तडजोडीचा' एक उत्कृष्ट नमुना ठरली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे राजू भाऊ भांदुर्गे यांची बिनविरोध निवड आणि भाजपची अनपेक्षित माघार, याने जिल्ह्याच्या राजकारणात 'फिक्सिंग'चा नवा पॅटर्न अधोरेखित केला आहे.

ज्या ठिकाणी आकड्यांचे गणित स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकण्याची चिन्हे होती, तिथे भाजपने अचानक घेतलेली 'नरमाईची' भूमिका हा निव्वळ योगायोग नसून एक सुनियोजित राजकीय तडजोड असल्याचे बोलले जात आहे.

एमआयएमची 'दांडी' आणि भाजपचे 'मौन'

नगर परिषदेच्या राजकारणात १७ हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी रस्सीखेच सुरू असतानाच, एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी निवडणुकीतून काढलेली पळवाट (अनुपस्थिती) अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. सभागृहाची प्रभावी सदस्य संख्या ३० वर आली असताना, सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने रणांगणातून माघार घेणे हे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. "रणांगण सजलेले असताना आणि शस्त्र हातात असतानाही युद्ध न खेळणे" ही भाजपची रणनीती म्हणजे मित्रपक्ष आणि विरोधकांना सोबत घेऊन चालण्याचे एक 'अजब' समीकरण सर्वांना आज बघायला मिळाले.

स्वीकृत सदस्य निवडीमध्ये भाजपने अत्यंत चतुराईने पत्ते खेळले आहेत. भाजप चे निष्ठावंत आणि नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाला न्याय देण्यासाठी गणेश खंडाळकर यांना संधी देऊन मोठी खेळी केली , तर निलेश जीवनानी यांच्या रूपाने नाराज सिंधी समाजाला पुन्हा जवळ करण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला. दुसरीकडे, शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या पत्नी रेखा सुरेश मापारी यांची निवड करून सत्तावाटपाचा हा 'केक' सर्वांना समान वाटण्यात आला आहे.

"विरोधी बाकावर बसून जनतेसाठी घसा कोरडा करण्यापेक्षा, सत्तेच्या पंगतीत मांड ठोकून बसणे केव्हाही सोयीचे! मग त्यासाठी पक्षाची 'तत्वे' आणि 'विचार' काही काळासाठी बाजूला ठेवावे लागले तरी चालतील, हेच आजच्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे."

या सर्व घडामोडींचा दुसरा सकारात्मक पैलू असा की, आता नगर परिषदेत कोणाचेही 'एकतर्फी' वर्चस्व उरलेले नाही. अध्यक्ष भाजपचे, उपाध्यक्ष शिवसेनेचे आणि स्वीकृत सदस्य सर्वांचे! अशा या 'खिचडी सत्तेमुळे' आता शहराच्या विकासाच्या कामात तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. मात्र, 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेचा खरा अर्थ 'सर्वपक्षीय नगरसेवकांचा विकास' असा तर नाही ना ? अशी खोचक चर्चा सुद्धा आता वाशिमच्या चौकाचौकात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT