private bus File Photo
वाशिम

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणाऱ्या खासगी बस वाहनांवर होणार कारवाई

गणेशोत्सवानिमित्त राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होत असल्याने खासगी कंत्राटी प्रवासी बस वाहतूकदारांकडून जादा अथवा मनमानी भाडे आकारले जाण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ganeshotsav 2026

वाशिम : गणेशोत्सवानिमित्त राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होत असल्याने खासगी कंत्राटी प्रवासी बस वाहतूकदारांकडून जादा अथवा मनमानी भाडे आकारले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम यांच्या वतीने दि. ११ सप्टेंबर २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांसाठी आकारण्यात येणारे भाडे हे संबंधित मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या भाड्यापेक्षा कमाल ५० टक्क्यांहून अधिक नसावे. त्यामुळे खासगी बस वाहतूकदारांनी शासनाने निर्धारित केलेल्या कमाल भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारू नये, असे आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान खासगी बस वाहनांची तपासणी करून जादा भाडे आकारणी, परवान्याच्या अटींचा भंग, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, आपत्कालीन यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, पॅनिक बटन, फिटनेस व इतर आवश्यक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. दोष आढळल्यास मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.

खासगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्याची माहिती स्पष्टपणे प्रसिद्ध करावी, तसेच ऑनलाइन आरक्षित तिकिटे व प्रत्यक्ष आकारण्यात आलेले भाडे यामध्ये तफावत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रवाशांनीही तिकीट घेताना आकारण्यात आलेले भाडे तपासावे व जादा भाडे आकारले जात असल्यास संबंधितांनी परिवहन कार्यालयाकडे dyrto.37-mh@gov.in या ई-मेल वर तक्रार करावी.

प्रवाशांची सुरक्षितता, सुविधा आणि त्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी परिवहन विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन वाशीम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT