

कमलाकर होवाळ
माणगाव: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे धावणाऱ्या लाखो गणेशभक्तांच्या वाहनांचा वाढता रेटा लक्षात घेता, रा.जि. पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसाठी कंबर कसली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील माणगाव आणि इंदापूर परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही महत्त्वाच्या भागांत रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आला आहे.
महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाल्यास वाहतूक वळविण्यासाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. अशी माहिती रा.जि. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून दिली असून गणेश उत्सवाच्या काळात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आली असून काही पोलीस या मार्गावर गस्त घालणार आहेत.
त्याचप्रमाणे माणगाव, इंदापूरात येथे नो पार्किंग करण्यात आली आहे. पेण ते पोलादपूर दरम्यान गणेश भक्तांना आपल्या गावी सुखरूप व वेळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवले त्यामुळे वाहतूकीसाठी पोलिसांनी रोड मॅप व ठीक ठिकाणी दिशादर्शक फलक लावून ‘मास्टर प्लॅन’ आखला आहे.
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड-अलिबाग यांच्या अहवाला नुसार गणेशोत्सवासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांतून मोठ्या संख्येने गणेशभक्त तळकोकणाकडे रवाना होतात.
रायगड मधून मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ तसेच पाली फाटा (खोपोली)-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-अ हे कोकणाकडे जाणारे प्रमुख मार्ग असल्याने या मार्गांवर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वा.पासून १५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वा.पर्यंत महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर परिसरात ‘नो पार्किंग’ आदेश लागू राहणार आहे. यामध्ये माणगाव येथील रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल, तसेच इंदापूर येथील माही हॉटेल ते कशेणे बायपासचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठा, हॉटेल परिसर आणि महामार्गा लगत होणारे अनधिकृत पार्किंग वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरू शकते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
कोंडी झाली तर पर्यायी मार्ग खुले असून मुंबई-गोवा महामार्गावर एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे.
२६ सप्टेंबर पर्यंत वाहतूक नियंत्रण ठेवण्यात आले असून रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५, ११६(१) (अ)(ब), ११७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
ही अधिसूचना ११ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा अबाधित राहाव्यात यासाठी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि शासकीय वाहनांना या वाहतूक नियंत्रणाच्या तरतुदीतून वगळण्यात आले आहे.
गणेशोत्सवात महामार्गावर वाढणारा वाहनांचा ताण, अरुंद ठिकाणी होणारे पार्किंग आणि बाजारपेठामधील गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेची खरी परीक्षा होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी आखलेल्या या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी आणि वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे, या दोन्ही बाबी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.
कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग
पेण येथे कोंडी झाल्यास : तरणखोप- पेण बायपास-गागोदे-वरसई-पाली फाटा-परळी-जांभुळपाडा-वाकण या मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
वडखळ येथे कोंडी झाल्यास : वडखळ-पोयनाड-पेझारी चेकपोस्ट-कुर्डूस-नागोठणे-वाकण हा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे.
नागोठणे येथे कोंडी झाल्यास : नागोठणे-वेलशेत फाटा-वरवठणे-भिसेखिंड-वाकण तसेच नागोठणे-वेलशेत फाटा-वरवठणे-भिसेखिंड-रोहा-वाकण या मार्गांचा वापर करता येणार आहे.
वाकण-नागोठणे परिसरात वाहतूक ठप्प झाल्यास : वाकण-पाली-नांदगाव-विळे-सुतारवाडी-कोलाड, तसेच वाकण-पाली-नांदगाव-विळे-निजामपूर-माणगाव या मार्गांसह ढालघरकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांचा वापर केला जाणार आहे.
माणगाव येथे वाहतूक कोंडी झाल्यास - माणगाव-निजामपूर नाका-साईराम हॉटेल ब्रिज-मुगवली ब्रिज या मार्गाने वाहतूक वळविण्याचे नियोजन
कोलाड येथे कोंडी झाल्यास : कोलाड - सुतारवाडी - विळे - निजामपूर - माणगाव हा पर्यायी मार्ग राहणार आहे.
लोणेरे येथे कोंडी झाल्यास :- लोणेरे-गोरेगाव-नांदवी-आंबेत-म्हाप्रळ या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. तर राजेवाडी फाट्यापुढे पोलादपूरच्या दिशेने वाहतूक कोंडी झाल्यास टोळफाटा (महाड)-आंबेत-म्हाप्रळ हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.