Fraud Case Pudhari
वाशिम

Fraud case washim : निवृत्त शिक्षकाची ५५.५१ लाखांची फसवणूक

बनावट कागदपत्रे अन् बोगस महिला उभी करून जमिनीचा डमी व्यवहार; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

अजय ढवळे

वाशीम : बनावट ओळखपत्रे, खोटे दस्तऐवज आणि तोतया महिला उभी करून एका निवृत्त शिक्षकाची सुमारे ५५ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखला करण्याची मागणी केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

एकांबा (ता. जि. वाशीम) येथील रहिवासी आणि निवृत्त शिक्षक लक्ष्मण प्रल्हाद वानखेडे (वय ५९ वर्षे) हे १२ एप्रिल २०२५ रोजी शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम आणि अनसिंग येथील प्लॉट विक्रीतून आलेले पैसे अशा एकूण ५५.५१ लाख रुपयांमधून त्यांनी वाशीम शहरातील हिंगोली नाका परिसरातील नगर पालिका हद्दीतील प्लॉट क्र. २२ (न.शि.क्र. ११९ सी.स.न. ५११२/२२, क्षेत्रफळ १५० चौ.मी.) खरेदी करण्याचे ठरवले होते.

मात्र, या व्यवहारात मूळ मालक श्रीमती अश्विनी अनिल मोरे यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या नावाने बनावट आधार कार्ड व दस्तऐवज तयार करण्यात आले. त्यानंतर एका महिलेने स्वतः 'अश्विनी मोरे' असल्याचे भासवून नोंदणी कार्यालयात व्यवहार पूर्ण केला. या संपूर्ण कटात फिर्यादीची दिशाभूल करण्यासाठी टाटा नेक्सॉन (क्रमांक MH 37 AH 3175) या वाहनाचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या निवेदनानुसार, यापूर्वी ३ ऑक्टोबर २०२५, ३ फेब्रुवारी २०२६ आणि ३ ऑगस्ट २०२६ रोजी वाशीम शहर पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही ठोस कारवाई झाली नाही. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी बाळकृष्ण गायकवाड याने पैसे परत देण्याचा समझोता लिहून दिला होता, मात्र तरीही रक्कम परत मिळाली नाही.

आरोपींना शहर पोलीस यांच्याकडून अभय मिळत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. याप्रकरणी दोन दिवसांत स्वतंत्र FIR नोंदवून आरोपींना अटक न केल्यास आणि प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे न सोपवल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आणि आत्मदहन करण्याचा इशारा लक्ष्मण वानखेडे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT