Drought File Photo
वाशिम

Washim Drought | दीपावली सणावर दुष्काळाचे सावट! वाशीम जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात

यंदाची दिवाळी गोड होणार की चिंतेत जाणार?

पुढारी वृत्तसेवा

Washim Farmers Crisis

अजय ढवळे

वाशिम : आनंद, उत्साह आणि मांगल्याचा संदेश घेऊन येणाऱ्या दीपावली सणावर यंदा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. वर्षभर शेतात राबून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे निराशा पडली आहे. पावसाची अनियमितता, पिकांची झालेली हानी आणि वाढता शेतीचा खर्च यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून, आगामी दिवाळीचा सण साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न अनेक शेतकरी कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे.तर मुख्यमंत्री यांच्या ५ हजाराने दीपावली कशी साजरी करावी? हार्दिक हि एक. मोठा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी कुटुंबे वर्षभराचे नियोजन करतात. मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च, शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि सणासुदीच्या गरजा यांची पूर्तता करण्यासाठी शेतकरी खरीप पिकांच्या उत्पन्नाकडे आशेने पाहतात. मात्र, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

दिवाळीच्या खरेदीवरही आर्थिक संकटाचे सावट

दीपावली म्हटले की नवीन कपडे, फराळ, मिठाई, घराची सजावट, लक्ष्मीपूजन आणि नातेवाइकांच्या भेटीगाठी असा आनंदाचा माहोल असतो. मात्र, हातात पैसा नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना यंदा सणाच्या खर्चाला कात्री लावावी लागण्याची शक्यता आहे. बाजारपेठांमध्ये दिवाळीची लगबग सुरू होत असताना ग्रामीण भागातील आर्थिक अडचणींचे चित्रही चिंताजनक आहे.

शेतीसाठी केलेला खर्च, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवरील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उरणारी रक्कम कमी झाली आहे. त्यातच पीक उत्पादन घटल्यास कर्जाची परतफेड आणि आगामी रब्बी हंगामाची तयारी कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

मदतीच्या प्रतीक्षेत बळीराजा

नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. पीकविमा, नुकसानभरपाई आणि इतर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळाल्यास संकटग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल, या अपेक्षेने शेतकरी शासनाकडे पाहत आहेत. मात्र, मदतीच्या घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ यामधील अंतर कमी होणे आवश्यक आहे. केवळ आश्वासनांपेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत मदत जमा होणे महत्त्वाचे आहे.

शेतकऱ्यांच्या घरातही उजळू द्या दिवाळीचे दिवे!

दीपावली हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक विवंचनेचा अंधार असेल, तर सणाचा आनंद अपूर्णच राहतो. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे.

यंदा प्रत्येकाच्या घरात दिवाळीचे दिवे उजळावेत, शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान फुलावे आणि बळीराजाला नव्या हंगामासाठी उभारी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता शासन शेतकऱ्यांच्या या वेदनेची कितपत दखल घेते आणि दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT