वर्धा : सात आरोपींवर दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सावंगी (मेघे) पोलिसांनी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरातील पोलीस स्टेशन सावंगी (मेघे), वर्धा शहर, रामनगर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शरीराविरूध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे संघटीत गुन्हेगार अक्षय दिगांबर पटले, अजय उर्फ तोतल्या वासुदेव राठोड, रंजितसिंग उपंद्रसिंग थुरवाल सर्व रा. बोरगाव (मेघे), रोशन सुनिल लिडबे, सौरभ बोरकर दोन्ही रा. सावंगी (मेघे) वर्धा यांच्यावर सावंगी (मेघे), वर्धा शहर, रामनगर पोलिस ठाण्यात ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते.
आरोपी हे संघटीतपणे एकत्र येवून गुन्हे करण्याच्या सवईचे होते. त्यांच्यावर पायबंद घालण्याच्या उददेशाने तडीपारीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते. त्याचप्रमाणे पो.स्टे सावंगी (मेघे) हद्दीत सालोड (हिरापुर) येथील राहणारे व संघटीतपणे अवैधरीत्या सराईत दारुवीकी करणारे शालू सुधिर खोब्रागडे व कांचन आकाश खोब्रागडे दोन्ही रा. सालोड (हिरापुर) ता.जि. वर्धा. यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन अभिलेखावर ४० पेक्षा जास्त दारूबंदी कायदयान्वये कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात आले.
वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच होता. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यापासून अत्यंत त्रास असल्याने पायबंद घालण्याच्या उद्देशाने आरोपींवर तडीपारीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे ठाणेदार संदीप कापडे यांनी आरोपींविरूद्ध कागदोपत्री कारवाई करून हद्दपारीचा प्रस्ताव वरीष्ठांकडे सादर केला. वरिष्ठांनी सातही आरोपीतांना कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये वर्ष कालावधीकरीता वर्धा जिल्ह्याच्या बाहेर भद्रावती, चंद्रपूर, नेर जि. यवतमाळ, मंगरूळ दस्तगीर जि. अमरावती येथे हद्दपार केले आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ठाणेदार संदीप कापडे यांनी तसेच पोलिस उपनिरीक्षक नबी शेख, कैलास खोब्रागडे, सतिश दरवरे, संजय पंचभाई, सचिन घेवंदे, अनिल वैद्य, निलेश सडमाके, निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केली.