

वर्धा : नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर जाम चौरस्ता परिसरात सोयाबीन भरून जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. नागपूरकडून आदिलाबाद येथे जाताना २६ मे रोजी ही घटना घडली. यामध्ये ट्रक सह सोयाबीन जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूरकडून सोयाबीन भरलेला ट्रक आदिलाबाद येथे जात होता. दरम्यान, जाम चौरस्ता येथे ट्रकच्या बॅटरीमध्ये स्पार्क झाले. चालकाने ट्रक बाजूला लावून खाली उतरला असता आग लागून ट्रकने पेट घेतला. आगीत ट्रक तसेच सोयाबीन जळाले. घटनेची माहिती हिंगणघाट व सिंदी रेल्वे येथील अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत ट्रकसह सोयाबीन जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. समुद्रपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार रवींद्र रेवतकर, महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक सपाटे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.