वर्धा : ऑनलाईन नेट मीटरिंग तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी २ हजारांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी (दि.२४) बोरगाव (मेघे) येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग कार्यालय परिसरात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारकर्त्याने ग्राहकाच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविले. सोलर पॅनल बसविल्यानंतरही सहाय्यक अभियंत्यांनी नेट मीटरिंग न केल्यामुळे ग्राहकाला वीज बिल जास्त येत होते. याबाबत संबंधितकडे अर्ज दाखल केला होता. ऑनलाइन नेट मीटरिंग तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहायक अभियंता मधुसूदन पेठे यानी साडेतीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचला. व पेठे यांना २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.