Nitesh Karale FIR Police Pudhari
वर्धा

Nitesh Karale: राजकारणात खळबळ! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश कराळे पोलिसांच्या ताब्यात; 'त्या' व्हिडिओमुळे आले अडचणीत

Nitesh Karale Detained: नितेश कराळे यांना एका समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Shelke

Nitesh Karale Detained: वर्ध्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्राध्यापक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे मास्तर अडचणीत सापडले आहेत. नितेश कराळे यांच्यावर सोशल मीडियावरील एका व्हिडिओतील वक्तव्यावरून कारवाई करण्यात आली आहे.

एका समाजाबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे वर्धा शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली असून कराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वर्ध्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पहाटेच्या सुमारास पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास नितेश कराळे यांच्यावर कारवाई केली. सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओतील वक्तव्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ आणि इतर उपलब्ध पुराव्यांची दखल घेत तपास सुरू केला.

या प्रकरणात तक्रारदार अजय शंकरराव डोंगरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे नितेश कराळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी कराळे यांना ताब्यात घेतल्याचे समजते.

मात्र, या प्रकरणातील कारवाईची संपूर्ण अधिकृत माहिती आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया याबाबत पोलिसांकडून सविस्तर निवेदन येणे बाकी आहे.

‘आरक्षण हटाव’ व्हिडिओवरून वाद पेटला

तक्रारीनुसार, 31 जुलै 2026 रोजी ‘आरक्षण हटाव’ या विषयावर आधारित एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या काही वक्तव्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

संबंधित वक्तव्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा तसेच समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराने व्हिडिओची लिंक आणि अन्य संबंधित पुरावे पोलिसांकडे सादर केल्याची माहिती आहे.

तक्रारीत संबंधित व्यक्तीविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला.

कोण आहेत नितेश कराळे मास्तर?

नितेश कराळे हे वर्ध्यातील परिचित नाव आहे. ‘कराळे मास्तर’ या नावाने त्यांची विशेष ओळख आहे. ते पेशाने शिक्षक असून सामाजिक कार्य आणि राजकारणातही सक्रिय आहेत. वर्ध्यातील फिनिक्स अकॅडमीचे संचालक म्हणूनही ते ओळखले जातात.

सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांचे आणि विविध विषयांवरील प्रतिक्रियांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. आपल्या थेट, बेधडक आणि अनेकदा विनोदी शैलीत ते राज्यातील सामाजिक, राजकीय आणि इतर घडामोडींवर भाष्य करत असतात. त्यामुळे त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असल्याचेही पाहायला मिळते.

राजकारणातील सक्रियतेमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे ते यापूर्वीही अनेकदा चर्चेत राहिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT