Vidarbha's Pune journey is now convenient! Nagpur-Pune 'Vande Bharat Express' enters service,
वर्धा : विदर्भातील युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने रोजगार व शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात. विदर्भातील जनतेची मागणी होती पुणे येथे जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करावी. विकसित भारताला आधुनिक प्रवासाची भेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा करुन विदर्भातील जनेतेसाठी वंदे भारत ट्रेन सुरू केली. आता विदर्भातील पुणे येथे जाणाऱ्या जनतेला प्रवासाचा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने वर्धा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अमर काळे, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक अनुराग जैन, मध्य रेल्वे नागपूरचे एडीआरएम अरुण कुमार, रवी शेंडे, संजय गाते यांच्यासह रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वंदे भारत रेल्वे म्हणजे विकसित भारताला आधुनिक प्रवासाची दिलेली भेट आहे. पुण्याला जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. वंदे भारत रेल्वेचा शेगाव येथे थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील नित्य क्रमाने शेगाव येथे जाणाऱ्या भाविकांना सुध्दा मोठा लाभ होणार आहे. जिल्ह्यात मागील दहा वर्षाच्या काळात रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचे मोठे काम झाले आहे. अनेक क्रांतीकारी निर्णय, योजना नवीन कामे देशाच्या विकासासाठी केल्या जात असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
खासदार अमर काळे म्हणाले, अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी, रोजगारासाठी पुण्याला जातात. बरेच दिवासांची वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी होती. आज ती पूर्ण झाली त्याबद्दल रेल्वे मंत्र्यांचे मी आभार मानतो. प्रवास आता अधिक वेगाने व सुखकर होणार आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक थांबे बंद करण्यात आले होते. त्यापैकी काही थांबे सुरू व्हायचे आहेत, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सुरुवातील रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांनतर लोकोपायलट यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
वंदे भारत रेल्वे विषयी
आठवड्यातून सहा दिवस नागपूर ते पुणे वंदे भारत रेल्वे सेवा सुरू असणार आहे. नागपूर ते पुणे 881 किमी अंतर कापेल. ही रेल्वे नागपूर वरुन सुटल्यानंतर वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड स्थानकांवर थांबा असेल. पुणे येथे जाण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागेल. ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलित असून एसी चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह एसी चेअर उपलब्ध असतील. नागपूर ते पुणे प्रवास पुर्वीपेक्षा जलद गतीने होणार आहे.