

नागपूर : बहुप्रतीक्षित पुणे-नागपूर (अजनी) वंदे भारत एक्स्प्रेस येत्या रविवारी, 10 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र, ही गाडी सुरू होण्यापूर्वीच तिच्या अयोग्य वेळापत्रकामुळे, जास्त दरांमुळे आणि स्लीपर कोचच्या अभावामुळे वादात सापडली आहे. खासगी बस लॉबीला फायदा पोहोचवण्यासाठीच रेल्वेने ही गैरसोयीची वेळ निवडल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.
ही गाडी नागपूरहून सकाळी 9.50 वाजता सुटून रात्री 9.50 वाजता पुण्यात पोहोचेल. दिवसभराचा 12 तासांचा प्रवास केवळ बसून करणे प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकते. 850 किलोमीटर लांब पल्ल्याच्या प्रवासात या गाडीत स्लीपर कोचची सुविधा नसणे ही सर्वात मोठी अडचण आहे. सध्याच्या हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेसच्या तुलनेत वंदे भारतचे तिकीट दर बरेच जास्त आहेत. सणासुदीच्या काळात खासगी बसचालक अवाच्या सव्वा दर आकारतात. त्यांचा व्यवसाय सुरळीत राहावा, यासाठीच वंदे भारतची वेळ गैरसोयीची ठेवल्याची टीका होत आहे.