वर्धा : अनेक वाहनधारक वाहनांचा मूळ सायलेन्सर काढून त्याला वेगळी पुंगळी बसवत कर्णकर्कश आवाज तयार करतात. अशा दुचाकींचे सायलेन्सर जप्त करत वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने बुलडोजर चालवण्यात आला. या कारवाईत शंभरावर सायलेन्सर निकामी करण्यात आले.
प्रत्येक वाहनांना कंपनीच्या वतीने सायलेन्सर लावण्यात येते. मात्र अनेक दुचाकी वाहनधारक सायलेन्सरमध्ये बदल करतात. फटाके फुटल्यासारख्या आवाजासह विविध आवाज सायलेन्सरमधून येतात. कानठळ्या बसवणाऱ्या या आवाजामुळे कानाशी संबंधित आजार देखील उद्भवण्याची शक्यता असते. मूळ सायलेन्सर काढून त्यामध्ये बदल करत लावण्यात येणारे सायलेन्सर डोकेदुखी ठरतात. असे सायलेन्सरवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक केंद्र शाखेच्या वतीने राबविण्यात येत आहे.
मध्यंतरीच्या काळात वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने अनेक दुचाकींचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. हे सायलेन्सर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने निकामी करण्यात आले आहेत. वर्गातील बजाज चौकामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी सायलेन्सरवर बुलडोझर फिरविण्यात आला. बुलडोझर फिरवत हे सायलेन्सर निकामी करण्यात आले. पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी सुनील चोपडे, मंगेश येळणे, कयूम शेख रियाज खान आशिष देशमुख, आरिफ खान, दिलीप कामडी, ज्योत्स्ना मेश्राम, शिल्पा पिसुड्डे, स्वप्निल तंबाखे यांनी कारवाईत सहकार्य केले.
वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. कर्णकर्कश सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे आजार देखील उद्भवू शकतात. यास आळा घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. कर्णकर्कश सायलेन्सर लावू नये. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी सांगितले.