पुणे : कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणार्या बुलेटचालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. 25 बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच सायलेन्सर जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत नागरिकांनी केले आहे. रात्री-अपरात्री शहर, तसेच उपनगरातून फटाके किंवा बंदुकीतून गोळी सुटल्याप्रमाणे आवाज करणार्या सायलेन्सरचा वापर बुलेटचालक करतात. मध्यरात्री गाढ झोपेत असलेले नागरिक फटाक्यासारख्या आवाजामुळे दचकून जागे होतात.
लोणी काळभोर भागात बुलेटचालक तरुण भरधाव वेगाने जातात. कर्णकर्कश सायलेन्सरमधून फटाके फुटल्यासारखे आवाज करतात, अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. त्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले. या पथकात चार अधिकारी, 15 पोलिस कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला. लोणी काळभोर परिसरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या पथकाने कारवाई करून 25 बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली. कर्णकर्कश आवाज करणार्या सायलेन्सर असणार्या बुलेट ताब्यात घेण्यात आल्या. कारवाई करण्यात आलेल्या बुलेट लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या.
बुलेटचे सायलन्सर पोलिसांनी जप्त केले. अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणार्या बुलेटचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. बुलेटचालकांकडून 25 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
सायलेन्सरमध्ये फेरफार केल्यानंतर त्यातून फटाक्यासारखा आवाज येतो. काही गॅरेजचालक सायलेन्सरमध्ये फेरफार करून देतात. परप्रांतातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, गॅरेजचालक अशा सायलेन्सरला इंदोरी फटका असे म्हणतात. यापूर्वी वाहतूक शाखेने शहरातील वेगवेगळ्या भागात कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणार्या बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली होती.
बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाज असणारे सायलेन्सर बसविण्यात येतात. अशा प्रकारच्या सायलेन्सरवर बंदी घालण्यात आली आहे. शहरात वाहनांचे सुटे भाग विक्री करणारे काही दुकानदार अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून देतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. कर्णकर्कश आवाज करणार्या सायलेन्सरचा वापर करणार्या बुलेटचालकांविरुद्ध यापुढील काळात तीव— कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिला आहे.