विदर्भ

यवतमाळ: पाच तालुक्यांना अवकाळीचा तडाखा; गारपिटीने पिके जमीनदोस्त

अविनाश सुतार

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दिग्रस, आर्णी, बाभुळगाव, महागाव आणि दारव्हा तालुक्यातील काही गावात मंगळवारी वादळवाऱ्यासह गारपीट झाली. तर यवतमाळसह इतर नऊ तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यात काही घरांची अंशत: पडझड झाली. काही ठिकाणी टिनपत्रे उडून गेले. तर आर्णीमध्ये वीज कोसळून गायीचा मृत्यू झाला. हवामान विभागाने पुढील चार दिवस सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तासी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा होता. यामुळे गावखेड्यात घरावरचे टिनपत्रे उडून गेले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. बाभूळगाव तालुक्यातील उमरडा, उमरी, चिमणा बागापूर, नांदे सावंगी या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आला. घरावरचे टिन उडून गेले. यात ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारासह पाऊस बरसला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आर्णी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस बरसला, कोळवन येथील शेतकरी दत्ता गोविंद कुंद्दलवार यांच्या शेतात वीज पडून गाईचा मृत्यू झाला.

मंगळवारी दिग्रस, महागाव आणि दारव्हा तालुक्यात पुन्हा बोराच्या आकाराच्या गारा बरसल्या. यात तीळ, ज्वारी, गहू, मूग, संत्रा, भुईमुग, मका, आंबा, फूलशेती, भाजी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हवामान विभागाने २५ ते २९ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाचा परिणाम येणाऱ्या पावसाळ्यावर होण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT