Who is Tukdoji Maharaj information Marathi
पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेले श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम (मोझरी) हे आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले आहे.हे तीर्थक्षेत्र केवळ अध्यात्माचे नाही, तर ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आणि मानवतेचे संगमस्थान बनले आहे.
गांधीवादी विचार आणि विश्वबंधुत्वाची भावना जोपासणारे हे केंद्र आता “आधुनिक तीर्थक्षेत्र” म्हणून ओळखले जाते. गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला आहे. ५ ऑक्टोबर रोजी तीर्थ स्थापनेने सुरू झालेला हा महोत्सव पुढील सात दिवस चालणार आहे.
या महोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात सामूहिक ध्यान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला फुलांनी आणि रोषणाईने सजवून सामुदायिक प्रार्थना देखील केली जाते. 11 ऑक्टोबर 1968 मध्ये तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण झाले. त्यामुळे दरवर्षी देश-विदेशातील त्यांचे अनुयायी गुरुकुंज मोझरी येथे त्यांना मौन श्रद्धांजली देतात. यावर्षी देखील आयोजन करण्यात आले आहे.
जन्म आणि बालपण:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) होते. वडिलांचे नाव बंडोजीबुवा आणि आईचे नाव मंजुळामाय होते. त्यांनी चांदूरबाजार येथे तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांना भजन, ध्यान आणि नामस्मरणाची आवड होती. 1922 मध्ये वरखेड येथे त्यांची सद्गुरु आडकोजी महाराजांशी भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक दीक्षा घेतली. आडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘माणिक’ वरून ‘तुकडोजी’ ठेवले आणि पुढे ते संत, समाजसुधारक व राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाऊ लागले.
आश्रमाची स्थापना आणि पार्श्वभूमी:
१९३५ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी गवताची कुटी उभारून भजन, सेवा आणि शिक्षणकार्य सुरू केले. गावातील जनतेच्या सहकार्याने काही वर्षांतच येथे आश्रम, रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि ग्रामपंचायत उभारली गेली.
राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत होती जी सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे स्थापन झाली.
सर्वधर्मीय समन्वयाचे तीर्थक्षेत्र:
गुरुकुंज आश्रम हे “सबके लिये खुला है, मंदिर यह हमारा” या ब्रीदाखाली कार्यरत आहे.
येथील प्रार्थना मंदिरात सर्व धर्मांच्या देवतांना आणि संतांना समान स्थान दिले गेले आहे. येथील वातावरणात प्रवेश करताच विश्वात्मक भावना जागृत होते. धर्म, पंथ, जातीभेद यापलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणणे हेच या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.
दास टेकडीवरील आध्यात्मिक ऊर्जा:
गुरुकुंजपासून जवळ असलेल्या दास टेकडीवर तुकडोजी महाराजांनी रामकृष्णहरी मंदिर उभारले.
शेवटच्या काळात त्यांनी याच ठिकाणी एकांतवास केला आणि विश्वमानव मंदिर उभारण्याचा विचार मांडला. येथे जागतिक दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचा त्यांचा मानस होता. आज दास टेकडीवरील वातावरण हे आश्रमाइतकेच पवित्र आणि ऊर्जामय वाटते.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्य:
गुरुकुंज आश्रम परिसरात अनेक संस्था आज समाजसेवा करत आहे.श्री गुरुदेव कनिष्ट महाविद्यालय, श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालय व औषध निर्माण केंद्र या संस्था ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि स्वावलंबनाचा संदेश पोहोचवतात.
ग्रामगीता- आश्रमाचा आत्मा:
‘ग्रामगीता’ या त्यांच्या महान ग्रंथाद्वारे महाराजांनी आदर्श ग्रामजीवनाचे तत्वज्ञान दिले. स्वच्छता, शिक्षण, श्रमाची प्रतिष्ठा, स्त्री–पुरुष समानता आणि स्वावलंबन यावर त्यांनी भर दिला. गुरुकुंज आश्रमातील प्रत्येक उपक्रम ‘ग्रामगीते’च्या विचारांशी घट्ट जोडलेला आहे. राष्ट्रसंतांची 'ग्रामगीता' ही महाराजांनी लिहिलेली एक आदर्श ग्रामजीवन आणि ग्रामीण विकासावर आधारित काव्यरचना आहे. या ग्रंथात त्यांनी ग्रामीण समुदायाच्या विकासासाठी आवश्यक असलेले आदर्श, अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमप्रतिष्ठा, आणि मानवतेच्या कल्याणाचे विचार मांडले आहेत. ग्रामगीता ही ग्रामविकासासाठी एक संदर्भग्रंथ असून, तिने भगवद्गीतेच्या तत्त्वांना गांधी विचारांशी जोडले आहे.
पुण्यतिथी महोत्सव, हजारोंचा जनसागर:
प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. या काळात हजारो भाविक, संत, समाजसेवक, तसेच देशभरातून येणारे विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतात. सामूहिक प्रार्थना, भजन, ग्रामगीता पठण, आणि आरोग्य शिबिरे या माध्यमातून महाराजांच्या विचारांची नवी प्रेरणा दिली जाते. यंदा 5 ऑक्टोबर 2025 पासून हा महोत्सव सुरू झाला आहे. 11 ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंतांना देश विदेशातील त्यांचे अनुयायी मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहे. विशेष म्हणजे हा सोहळा सर्वधर्मसमभाव जोपासणारा एक आगळावेगळा उपक्रम म्हणून देखील संपूर्ण देशात परिचित आहे. यामध्ये देशातील आणि विदेशातील अनेक धर्मपंथ संप्रदायाचे प्रमुख एकत्र येऊन राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करतात. राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य चळवळीत भजन, भाषण आणि खंजिरी भजनांच्या माध्यमातून जनजागृती केली. १९४२ च्या ‘भारत छोडो’ चळवळीत त्यांनी लोकांना संघटित करून क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांच्या भजनातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळून विदर्भात स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडली. त्यांनी गुरुकुंज आश्रमात ‘राष्ट्रधर्म शिक्षण वर्ग’ सुरू करून युवकांना देशसेवेची दिशा दिली. अहिंसेचा मार्ग स्वीकारून त्यांनी लोकांमध्ये एकतेचा संदेश दिला. या कार्यामुळे त्यांना ब्रिटिशांनी १९४२ मध्ये अटक केली. त्यांच्या सेवाभावी जीवनामुळे डॉ. राजेंद्र प्रसादांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही मानाची पदवी प्रदान केली.