

Maratha reservation GR cancellation Issues
नागपूर : मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण ओबीसीमधून आरक्षण द्यायला मात्र सकल ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. 2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा, या मागणीसाठी आज (दि.१०) नागपुरात सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चा काढण्यात आला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे ज्या जीआर ला आपला विजय मानतात. तो जीआर ओबीसींना मारक, घातक आहे, या एकाच मागणीसाठी हा मोर्चा आहे. यात कुठलाही राजकीय उद्देश नाही, अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखविली.
या मोर्चासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे आणि इतर अनेक नेते, विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि विदर्भच नव्हे तर राज्यभरातून ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने नागपुरात एकवटला आहे. यामुळे मेडिकल चौक, इमामवाडा, धंतोली, सीताबर्डी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विदर्भातील सकल ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबररोजी नागपुरात महामोर्चाची हाक दिली होती. मुंबईत नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली. यावेळी जीआर रद्द करा यासोबतच इतर मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्याने विविध ओबीसी संघटना या मोर्चावर ठाम राहिल्या.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर २ सप्टेंबररोजी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयात पात्र हा शब्द वगळण्यात आला. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळू शकते, यातून ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. सरकारच्या निर्णयानंतर मराठवाड्यात काही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले. सरकारने जो शासन निर्णय जारी केला यातून ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार आहे.
याविरोधात ओबीसी महासंघाशिवाय विदर्भातील सर्व ओबीसी संघटना एकवटल्या आहेत. विदर्भातील जिल्हा जिल्ह्यात ओबीसी संघटनांनी बैठका घेऊन या शासन निर्णयाला विरोध करण्याचा ठराव झाला. गोंदिया जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी ओबीसी संघटनांनी आक्रोश मोर्चा देखील काढला. पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चे निघून या शासन निर्णयाला विरोध करण्यात आला.
तसेच पश्चिम विदर्भात यवतमाळ, वाशिम,वर्धा अमरावती, बुलढाणा, अकोला इथे देखील मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या शासन निर्णयाला विरोध करणारे मेळावे घेतले. केवळ एका समाजाच्या दबावाखाली येऊन सरकार जर ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणार असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही, हा संदेश या मोर्चातून देण्यात येत आहे.