विदर्भ

नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक

अविनाश सुतार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी बफर क्षेत्रातील सिल्लारी बिटजवळील तलावात मृतावस्थेत वाघ आढळून आला होता. ही घटना गुरुवार, १२ जानेवारी रोजी  उघडकीस आली होती. या घटनेच्या तपासात चार आरोपींना अटक करण्यात आली. तर काही आरोपी फरार असल्याची माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. या वाघाला विजेचा शॉक देऊन मारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वाघाला मारल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून ते तलावाच्या खोल पाण्यात दगडांच्या साह्याने बुडवून ठेवण्यात आल्याचे वन विभागाच्या तपासात आढळून आले. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची १७ जानेवारीपर्यंत वन कोठडी घेण्यात आली आहे. वनविभागाच्या तपास पथकाने वाघाचे अवयव कापलेली जागाही शोधून काढली आहे. ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गावकऱ्यांना लक्षात हा प्रकार आल्यावर वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी पथकासह तातडीने तलावावर धाव घेऊन पाहणी केली. मात्र, तो नक्की वाघच असल्याचे स्पष्ट होत नव्हते. परंतु कापलेल्या अवयवांना मोठे दगड बांधलेले आढळल्यावर संशय बळावला. त्यानंतर तो वाघच असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

पेंचच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, प्राधिकरणचे प्रतिनिधी बंडू उइके, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी अजिंक्य भटकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. आसपासच्या गावांमध्ये चौकशी केल्यावर घोटी गावातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या तिघांनी वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. त्यांच्या चौकशीतून चौथ्या आरोपीचा छडा लागला व त्यालाही अटक करण्यात आली.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT