नागपूर: पुढारी वृत्तसेवा – भगवान गौतम बुद्धांचा विचार हा जागतिक स्तरावर स्वीकारला गेला आहे. येणाऱ्या काळात समता व बंधुत्व टिकवण्याकरीता संविधानासोबतच बुद्धांचा धम्म आणि विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांचा विचार हा फक्त पुस्तकात न राहाता कृतीत येण्याची गरज आहे. बुद्धांच्या विचारात जगाच्या कल्याणाची प्रेरणा दडली असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे आयोजित धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यादरम्यान दीक्षाभूमीवर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा सोहळा बुधवारी (दि.०९) उत्साहात पार पडला. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमा आठवले, कमलताई गवई, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, समितीचे सचिव सुधीर फुलझेले आदी उपस्थित होते.
या वेळी गडकरी म्हणाले, बाबासाहेबांच्या कार्याची तुलना फक्त मार्टिन ल्युथर किंग यांच्या कार्याशी करता येईल. ते संविधान विशेषज्ञ असण्यासोबतच अर्थतज्ज्ञही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होण्यासाठी सामाजिक आर्थिक विकासाचा कार्यक्रम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. दीक्षाभूमी लगत असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत बराचसा फॉलोअप केला आहे. जून्या काळात आजची जागा मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा नवीन जागा मागणार नाही, असे समितीने लिहून दिले आहे. त्यामुळे जागेबाबत आजच काही स्पष्ट आश्वासन देता येणार नाही, असेही गडकरींनी स्पष्ट केले.
या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुद्धिस्ट सर्किटसोबतच देशभरातील रस्ते तयार करण्याचे काम नितीन गडकरी यांनी केल्याचे गौरवौद्गार काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधनाचा प्रचंड आदर असल्याचे आठवले म्हणाले. दीक्षाभूमी लगतची जमीन मिळवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला "अ' वर्गाचा दर्जा देण्याचा पाठपुरावा केंद्राकडे करू, असे आश्वासन दिले. पुढील १५ दिवसांत दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या नव्या आराखड्याला मंजूरी मिळेल. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता दीक्षाभूमी लगतच्या शासकीय कार्यालयांच्या जागा दीक्षाभूमीला देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. इंदुमिलची जागा पंतप्रधान मोदींनी एक रुपया न घेता दिली. लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांचे घर विक्रीला निघाले होते. ते युती सरकारने विकत घेतले. जपानमध्ये कोयासान विद्यापीठात आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.