विदर्भ

नागपूर: शरद पवार लवकरच विदर्भ दौऱ्यावर

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लवकरच विदर्भ दौऱ्यावर येणार असून पदाधिकारी व जनतेशी ते सुसंवाद साधणार असल्याचे आश्वासन त्यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना दिले आहे. पक्ष फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच विदर्भ दौऱ्यावर आले होते. आता शरद पवार देखील लवकरच विदर्भात येणार आहेत. विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी त्यांना विदर्भ दौऱ्याचे संकेत दिले.

पक्षाचे माजी मंत्री अनिल देशमुख सध्या विदर्भात पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. वर्धा, अमरावती, अकोला दौरा त्यांनी केला आहे. जो नेता मृत्यूवर मात करू शकतो, आयुष्यात वाट्याला आलेल्या असंख्य संकटांतून मार्ग काढू शकतो, देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी ठेवू शकतो, सामाजिक समता, सर्वधर्म समभाव व बंधुभावाच्या विचाराचा जागर करून एकता व अखंडतेच्या ध्येयाने प्रेरित होऊन समाजहिताचे राजकारण करू शकतो, असे नेते शरद पवार यांच्यासोबतच आमच्या निष्ठा व श्रद्धा आहेत. त्यांच्यासोबतच राहण्याचा आमचा निर्धार असल्याचे प्रदेश पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार शरद पवार यांची मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन आमचा पाठिंबा जाहीर केला, असे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष व कामगार नेते बजरंगसिंह परिहार यांनीसुद्धा याप्रसंगी आपला पाठिंबा जाहीर केला. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT