नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जाती व्यवस्था विसरली पाहिजे, हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य मीही माध्यमातून वाचले आहे. त्यांनी तसे म्हणणे समाधानकारक आहे. पण ही बाब आचरणात दिसली पाहिजे, अशी सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
समाजाच्या एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या ज्या यातना सहन कराव्या लागल्या आणि त्याच्या संदर्भातील जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या घटकांना त्याची जाण व्हायला लागली आहे, ते योग्य वक्तव्य आहे. मात्र, नुसतं माफी मागून चालणार नाही. मात्र, पुढे व्यवहारांमध्ये या सर्व वर्गासंदर्भात दखल कशी घेतली जाते, यावर सगळं अवलंबून आहे, असे पवारांनी सांगितले.
नाशिक अपघाताची सरकार चौकशी करीत आहे. चौकशीनंतर कारणे समोर येतील, जे जखमी आहेत, त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल, यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्य करत आहे. घडलेला अपघात दुःखद बाब आहे. जे गेले आहे, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत.
धनुष्यबाण कोणाला मिळेल, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. मला त्यात काही सांगण्याचे कारण नाही. निवडणूक आयोग या संदर्भातला निर्णय घेईल. आलेला निर्णय राजकीय पक्षांनी मान्य केला पाहिजे, असे पवारांनी स्पष्ट केले. बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्याचा विचार ते करतील, असेही पवार म्हणाले.
हेही वाचलंत का ?