नागपूर : मंगळवारी सायंकाळी झालेल्या संततधार पावसात पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. महेंद्र फटिंग असे या तरुणाचे नाव आहे. कामावरून परतताना लकडगंज परिसरात खड्ड्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. डीपटी सिग्नल प्रभागाच्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा तो भाचा असल्याने लगेच गर्दी जमली. पोलिसांनी तातडीने मेयो रुग्णालयात पाठविले.
शहरात ठिकठिकाणी कंत्राटदार मनमानीपणे काम करीत आहेत. कुणाचा त्यांच्यावर धाक नाही. खड्डे बुजवले जात नाहीत. अंधाराचे साम्राज्य असल्याने खड्डे दिसत नाहीत. वारंवार अपघात होत असताना कुणी लक्ष देत नाही. केवळ आर्थिक मदतीने कुणाचा जीव परत येणार आहे का ? असा तीव्र संताप यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाने व्यक्त केला.
मंगळवारी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दोन ते तीन तास संततधार कोसळत नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडविली. उड्डाणपूल, सिमेंट रस्त्याची कामे सुरू असलेल्या भागात तर रस्त्यावर पाणी भरलेले खड्डे, आउटलेट न मिळाल्याने रस्त्यावर जमा झालेले पाणी आणि यातून वाट काढताना नागपूरकरांची विशेषत वाहनचालकांची चांगलीच दैना झाली.
गांधीबाग, अग्रसेन चौक, चितार ओळ, इतवारी, गांधीगेट, शुक्रवारी, अशोक चौक अशा विविध भागात पावसाने मनपाचे पावसाळीपूर्व नाले सफाईचे देखील पितळ उघडे पाडले. अनेक बंद पडलेली दुचाकी वाहने रात्रीच्या वेळी हातात घेऊन जाण्याची कसरत करावी लागली. गडर तुंबल्याने ड्रेनेज सिस्टिम पूर्णतः कोलमडल्याचे चित्र पहायला दिसले.