

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच्या फोटोंसह जाहिराती कोणी छापल्या असतील, तर त्यामुळे रोहित पवार किंवा इतर विरोधकांच्या पोटात का दुखत आहे ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे विनाकारण पेपरात जाहिराती दिल्या जात होत्या. त्या वेळी जाहिरातीचे पैसे खर्च करूनही काही काम होत नव्हते. त्याचा हिशोब का मागितला जात नाही? असा परखड सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व मोठे आहे, त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठीच जाहिराती दिल्या गेल्या. त्या सरकारने दिल्या , की खासगी पातळीवर दिल्या आहेत त्यात वाद घालण्याचा काही उपयोग नाही. ओबीसी संघटनांना आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही मागणी राजकीय होऊ नये, सामाजिक व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. दोन्ही कॅबिनेट सब-कमिट्या ओबीसी आणि मराठा समाजाला न्याय देतील आणि दोन्ही समाजांना एकमेकांसमोर उभे करणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे.
वडेट्टीवार यांनी तायवाडे यांचे मार्गदर्शन घ्यावे
दरम्यान, बबनराव तायवाडे हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. विजय वडेट्टीवार हे देखील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पक्षाचे नेते बबनराव तायवाडे यांचे मार्गदर्शन घ्यावे. बबनराव तायवाडे यांनी यापूर्वीच सरकारने काढलेल्या जीआर संदर्भात आपले कोणतेही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता नवी भूमिका घेण्याची गरज नाही. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पक्षनेत्यांची भेट घेऊन गैरसमज दूर करावेत असा सबुरीचा सल्ला दिला.