Opposition leader post
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीपासून तर आता अधिवेशन संपण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा अधांतरी आणि विरोधकांसाठी तापलेलाच आहे. शुक्रवारी (दि.१२) शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवन परिसरात दुपारी दाखल होताच या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला.
उद्धव ठाकरे, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, आमदार आज दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आम्ही गेल्या अधिवेशनापूर्वीच भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी पत्राद्वारे दिलेले असल्याचे स्पष्ट केले. एकीकडे घटनाबाह्य पद्धतीने दोन उपमुख्यमंत्री चालतात. मग विरोधी पक्षनेते पद का देत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
अर्थातच हा विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने सांगितले असल्याने आता विरोधी पक्ष नेते पदाची योग्य वेळ कधी येणार याविषयीची चर्चा विधान भवन परिसरात सुरू आहे. मध्यंतरी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून पुढे आले. दस्तुरखुद्द वडेट्टीवार यांनी मात्र ‘माझ्या नावासंदर्भात कुणीही माझ्याशी चर्चा केलेली नाही. माझे नाव कसे पुढे आले, याचा शोध घ्यावा लागेल,’असे वक्तव्य मंगळवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगवेगळी नावे पुढे येत आहेत. सोमवारी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांची नाव पुढे आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी शिवसेनेचे भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी भेटून विरोधी पक्षनेतेपद द्या, अशी मागणीही करण्यात आली होती.
मात्र, अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. विधिमंडळाच्या इतिहासात विधानसभा विधान परिषद हे दोन्हीकडे विरोधी पक्ष नेते नसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.